मूलभूत कर्तव्ये: अनुच्छेद ५१क (51A) मराठी पाठ व अर्थ

भारतीय नागरिकांची ११ मूलभूत कर्तव्ये मराठीत वाचा. अनुच्छेद ५१कचा पाठ, शिक्षणाचे कर्तव्य, पर्यावरण व वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा सोपा अर्थ.

हा पाठ इतर भाषांत: English · हिंदी · मराठी

अनुच्छेद ५१क (51A)

(क) संविधानाचे पालन करणे आणि त्याचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे ;#

(ख) ज्यांमुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळाली त्या उदात्त आदर्शांची जोपासना करून त्यांचे अनुसरण करणे ;#

(ग) भारताची सार्वभौमता, एकता व एकात्मता उन्नत ठेवणे व त्यांचे संरक्षण करणे ;#

(घ) देशाचे संरक्षण करणे व आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे ;#

(ङ) धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीला लावणे ; स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे ;#

(च) आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे मोल जाणून तो जतन करणे ;#

(छ) वने, सरोवरे, नद्या व वन्य जीवसृष्टी यांसह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे आणि प्राणिमात्रांबद्दल दयाबुद्धी बाळगणे ;#

(ज) विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधकबुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे ;#

(झ) सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे ;#

(ञ) राष्ट्र सातत्याने, उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल अशा प्रकारे व्यक्तिगत व सामुदायिक स्वरूपाच्या सर्व कार्यक्षेत्रात पराकाष्ठेचे यश संपादन करण्यासाठी झटणे ;#

(ट) मातापित्याने किंवा पालकाने सहा ते चौदा वर्षांदरम्यानचे आपले अपत्य किंवा, यथास्थिति, पाल्य याला शिक्षणाच्या संधी देणे,#

ही प्रत्येक भारतीय नागरिकाची कर्तव्ये असतील.#

अभ्यास: सोपा अर्थ आणि संबंधित माहिती

सोपा अर्थ आणि उदाहरणे

अनुच्छेद ५१क आणि 51A एकच आहेत का?

होय. मराठी आवृत्तीत इंग्रजीतील अक्षर A ऐवजी “क” वापरले आहे. हा अनुच्छेद भाग चार-क मध्ये आहे. यात (क) ते (ट) अशी अकरा कर्तव्ये दिली आहेत. शेवटचे वाक्य ही कर्तव्ये प्रत्येक भारतीय नागरिकाची असल्याचे सांगते.

कर्तव्ये कशी समजून घ्यावीत?

या यादीत संविधानाचा आदर, सामाजिक सलोखा, संस्कृती, पर्यावरण, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सार्वजनिक मालमत्ता यांचा समावेश आहे. उदाहरणार्थ, सार्वजनिक उद्यानातील झाडे व सुविधा जपणे हे पर्यावरण आणि सार्वजनिक मालमत्ता या दोन्ही कर्तव्यांशी जोडता येते.

मूलभूत कर्तव्यांच्या यादीतील प्रत्येक वाक्य स्वतःहून स्वतंत्र फौजदारी शिक्षा ठरवत नाही. एखाद्या कृतीवर शिक्षा किंवा सक्ती लागू होण्यासाठी संबंधित कायदा आणि त्याच्या अटी पाहाव्या लागतात. कर्तव्ये पाळली नाहीत म्हणून सर्व मूलभूत अधिकार आपोआप संपतात असेही नाही.

पालकांचे शिक्षणासंबंधी कर्तव्य

उपखंड (ट) सहा ते चौदा वर्षांच्या अपत्याला किंवा पाल्याला शिक्षणाच्या संधी देण्याविषयी आहे. ते अनुच्छेद २१क मधील राज्याच्या शिक्षणविषयक तरतुदीशी संबंधित आहे; पालकांचे कर्तव्य आणि राज्याची जबाबदारी यांची भूमिका वेगळी आहे.

सुधारणांचा संदर्भ

४२व्या संविधान सुधारणेने मूलभूत कर्तव्यांचा भाग समाविष्ट केला. ८६व्या सुधारणेने शिक्षणासंबंधी शेवटचे कर्तव्य जोडले. त्यामुळे फक्त दहा कर्तव्यांची जुनी यादी आजच्या अकरा उपखंडांचे संपूर्ण चित्र देत नाही.

कठीण शब्दांचे अर्थ

संमिश्र संस्कृती
विविध परंपरांच्या सहवासातून घडलेला सांस्कृतिक वारसा.
विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन
दावे तपासताना पुरावा, प्रश्न आणि तर्क यांना महत्त्व देणे.
पाल्य
पालकाच्या देखरेखीतील बालक.

पाठाविषयी नोंदी

सुधारणा दर्शवणारे कंस व तळटीप क्रमांक वगळले आहेत; सर्व अकरा उपखंड आणि शेवटचे वाक्य ठेवले आहे.

अभ्यासासाठी निवडक पाठ व अर्थ; अधिकृत वापरासाठी मराठी–इंग्रजी आवृत्ती, २६ जानेवारी २०१४ पर्यंत फेरबदल · PDF पाने 88 पाहा.